Wednesday, May 4, 2016

खडे बोल..



नागराज मंजुळे हा अविश्वसनीय क्षमतेचा चित्रपट दिग्दर्शक आहे. ही  प्रतिमासृष्टी, प्रतिकात्मकता, शब्दकळा सिनेमानं यापूर्वी कधी पाहिली नव्हती. जागतिकीकरणानंतरच्या व्यवस्थेत ‘राइज ऑफ द रेस्ट’चे पर्व यावे आणि त्याचवेळी खुलेपणाचा अवकाश व्यापून नव्या मक्तेदारीसाठी जुन्याच सरंजामदारांनी सज्ज व्हावे, हे एकाच वेळी घडत असताना नागराजचा सिनेमा आला. 

नागराजचा सिनेमा ही त्याची गोष्ट आहे, असे अनेकांना वाटते. कदाचित त्यालाही तसे वाटत असेल. पण, ती गोष्ट त्याची एकट्याची नाही. ती या काळाची गोष्ट आहे. नागराजसारख्या दगडावर घाव घालण्यात आयुष्य गेलेल्या तरुणाचे अशा गोष्टीचे आपले असे एक आकलन असते. अवतीभवती कमालीचा अंधार असताना पहाटेचे स्वप्न पडावे, हा नव्या काळाचा चमत्कार खराच, पण त्या स्वप्नाच्या दिशेने चालताना मात्र कोलमडण्याची वेळ येते. होत्याचे नव्हते होते. तीव्र संताप येतो. हे सगळे बदलायला हवे, असे आतून वाटत जाते. जो ‘जादुई वास्तववाद’ नागराजच्या ‘फॅंड्री’त वेगळ्या पद्धतीने दिसतो, त्यापेक्षा प्रत्यक्ष वास्तव फार भयाण रुपात समोर येते. या वास्तवाला न जुमानता स्वप्ने पाहण्याची ताकद नागराजचा सिनेमा देतो. पण, स्वप्नांपेक्षा वास्तव अधिक प्रभावी, राक्षसी ठरते. अशावेळी स्वप्नांचा चोळामोळा होत असताना, वास्तव बदलण्याची अपरिहार्यता नागराजचा सिनेमा अधोरेखित करतो. एखाद्या कवितेप्रमाणे, ललित गद्याप्रमाणे पुढे सरकणारा त्याचा सिनेमा शेवटी आपल्याला खोल, खोल घेऊन जातो. 

साधारणपणे, सुरुवातीला संघर्ष आणि मग मध्यंतरानंतर सुखांत, अशा वातावरणातील सिनेमाने आपल्याला वाढवले आहे. हा सिनेमा मात्र आधी स्वप्नं दाखवतो, स्वप्नासाठी झगडतो आणि मग वास्तवाच्या समोर ते स्वप्न हतबल ठरतानाही आपण पाहातो. ‘फॅंड्री’तल्या जब्याचा दगड असो की ‘सैराट’च्या आर्चीची गोळी! एका अर्थाने, नागराज भयावह वास्तवाच्या पटावर स्वप्नचित्र रेखू लागतो. अशावेळी, हा सिनेमा जगणं सुंदर करण्याची आस बाळगून असतो. वास्तव कितीही भयावह असलं तरी त्यापासून पळ काढायचा, असं नायकाला-नायिकेला वाटत नाही. ही या सिनेमाची सकारात्मकता आहे. आणि, वास्तव तुमच्या स्वप्नांचा खून करतं, हे या सिनेमांचं वास्तवाविषयीचं आकलन आहे. 

हे आकलन त्या मातीत जन्माला आलं आहे, जिथं हे वास्तव वस्तीला आहे. नॉर्मली घडतं असं की वास्तवाच्या मुक्कामाचं ठिकाण आणि आकलन जिथून उगवतं ती साक्षात्कारी जागा यांच्यात काही जैव नातं नसतं. या सिनेमाची सगळी मूल्यव्यवस्था आणि प्रतिकात्मकता त्या मातीतील आहे. विहिरीत बुडी मारुन वर येणा-या नायकाची नायिकेशी होणारी नजरानजर हे प्रेमप्रकरण आपल्या भावविश्वात अमिट असले तरी बाहेरच्या रुपेरी विश्वात याला आजवर कधीच जागा नव्हती. “तुला नसंल आवडंत, तर नकोस की बघू” यावर “मी कुटं म्हनलं, मला नाय आवडत?” अशा संवादांवर पुन्हा मित्रांचा रंगणारा परिसंवाद, हे अनेकांचं जगणं होतं, पण ते पडद्याला कधी उमगलं नव्हतं. 

सिनेमा ‘खरा’ असला पाहिजे, या नादात जगभरातल्या अनेक दिग्दर्शकांनी तो प्रेक्षकांपासूनच हिरावून घेतला. कंटाळवाणा, बोर, संथ आणि अधिक तंत्रज्ञानी केला. (त्यातून खोट्या सिनेमाचा बोभाटा जास्तीच वाढला!) कारण, हे खरेपण पुस्तकी होते. सिनेमा खरा व्हायचा असेल, तर तो ख-याखु-या माणसांचा, खरी भाषा बोलणारा, खराखुरा सिनेमा असायला हवा, हे नागराजच्या सिनेमाचे वेगळेपण आहे. तो खरा आहे आणि तरीही ‘सिनेमा’ही आहे! 

जागतिकीकरणाच्या पूर्वी असा सिनेमा येऊच शकला नसता. जागतिकीकरण आल्या-आल्या, म्हणजे, एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात वगैरे हा सिनेमा येऊ शकला असता, पण तो फ्लॉप ठरला असता. जागतिकीकरणाचे दुसरे पर्व सुरु असताना, हा सिनेमा येणे आणि तो चालणे, यात एक सूत्र आहे. पहिल्या टप्प्यात फक्त खुलेपणा आणि त्यामुळे खुणावणारे संधींचे आकाश होते. तीव्र झालेले ताणही जागतिकीकरणाच्या दुस-या टप्प्याने अधोरेखित केले आहेत. ‘राइज ऑफ द रेस्ट’ हे ऐकायला फार छान वाटते. पण, त्यामुळे वाढणारे ताण काय असतात, हे आपण बघत आहोत. जातीय संघर्ष ज्या तीव्रतेने दिसत आहेत, विखार आणि असहिष्णुतेचे वातावरण ज्या पद्धतीने समोर येत आहे, अशा वेळी असा सिनेमा येणे आणि उलटसुलट अशा, दोन्ही बाजूंच्या टोकदार चर्चेसह, तो प्रचंड यशस्वी होणे हे अगदी स्वाभाविक आहे. 

अशावेळी काही मराठा “नेत्यां”ना मिरच्या झोंबल्यात! जातीच्या नावाने संघटना स्थापन करुन जातीअंताची भाषा करणारे मराठा नेते दांभिक तर असतातच, पण नतदृष्ट त्याहून अधिक. फुले, आंबेडकरांचे, शाहूंचे नाव एखाद्या चलनी नाण्यासारखे वापरायचे आणि ब्राह्मणद्वेषाच्या जोडीला दलितविरोधही जपत आपले मराठेपण मिरवायचे, हे माहीत असलेल्या अशा मराठा नेत्यांना ‘सैराट’ कधी समजणार नाही. कारण, त्यांना शिवरायही समजलेले नाहीत. शिवरायांची समाधी ज्योतिबांनी शोधून शिवाजीचा पवाडा जगाला सांगितला नसता, तर यांच्यापैकी कोणालाही हा आपला प्रेरणास्रोत आहे, हे समजलेही नसते. तो बाबासाहेब आंबेडकर नावाचा महामानव चवदार तळ्याचा सत्याग्रह करताना सांगत होता, की मी हा सत्याग्रह इथे करतोय, कारण माझे त्या शिवबाशी, रयतेच्या राजाशी जैव नाते आहे. हे नाते ज्या मराठ्यांना समजत नाही, ते तेव्हाही शिवरायांसोबत नव्हते. 

ब्राह्मणद्वेषाचे राजकारण फक्त पुढे रेटण्यासाठी यांना बहुजनवाद हवा असतो. पण, ज्या न्यायाने ब्राह्मणवादाला विरोध करायला हवा, त्याच न्यायाने मराठावादालाही विरोध करायला हवा. कारण, दलित आणि महिलांच्या शोषणाची ॲकॅडॅमिक चौकट जरी ब्राह्मणांनी तयार केली असली, तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली ती मराठ्यांनीच. त्यामुळे या पापापासून त्यांना दूर पळता येणार नाही. दुसरे असे की, ज्या गतीने ब्राह्मण बदलले आणि तुलनेने सर्वसमावेशक होत गेले, एवढेच नाहीतर, परिवर्तनाच्या लढ्याचे शिलेदारही झाले, ते मराठ्यांच्या बाबतीत त्या प्रमाणात घडले नाही. आंतरजातीय- त्यातही मराठा-दलित असे किती विवाह झालेत, याची आकडेवारी ते स्पष्टपणे सांगेल. ‘आंतरजातीय प्रेमविवाह’ हा जातीअंताच्या संदर्भातील सगळ्यात मोठा पुरावा असतो. (दलित मुलांसोबत लग्न करुन अनेकदा रोजची होरपळ सहन करणा-या ब्राह्मण मुलींना ‘विषकन्या’ म्हणणा-या बामसेफी विखारवंतांना ही मूलभूत गोष्टच समजत नाही!) नात्यागोत्यांचे राजकारण करणारे किती मराठा पुढारी याबाबतीत पुढाकार घेताना दिसतात? ‘बघतोस काय, मुजरा कर’, अशा मस्तीत ज्यांची हयात गेली, त्या मराठा संघटनांना अलिकडे पुरोगामी वगैरे म्हणण्याची प्रथा पडून गेली आहे. ‘सैराट’मुळे मराठ्यांची बदनामी झाली आहे, असे म्हणणा-या मराठ्यांनी आता एक करावे. त्यांनी शिवरायांचे, शाहूंचे नाव घेणे बंद करावे. कारण, त्यांना तो नैतिक अधिकार नाही. ‘सैराट’ हा वाईट, सामान्य, सुमार सिनेमा आहे, असे कोणाचे मत असेल, तर त्या मताविषयी मला आदर असेल. असे मत कोणत्याही सिनेमाविषयी, कलाकृतीविषयी असू शकते. पण, या चर्चेला काही स्तर असावा!

नागराज हा प्रतिभावंत आणि प्रचंड ताकदीचा दिग्दर्शक आहे. हे माध्यम त्याला वश आहे. ‘सैराट’च्या प्रत्येक फ्रेममध्ये त्याने उत्कट प्रेम रेखाटले आहे. निसर्गाच्या सानिध्यातील एखाद्या खेड्यात माणसं किती निसर्गदत्त जगत असतात, किती आनंदानं नांदत असतात, असा आपला समज असतो. ‘टुरिझम ॲप्रोच’नं खेडं टिपणा-या लेखक-दिग्दर्शकांनी तो समज दृढ केलेला असतो. प्रत्यक्षात गावातलं जगणं अधिक हिंस्त्र, अधिक अमानुष आणि अधिक अनैसर्गिक असतं. (‘गाव सोडा’, असं बाबासाहेब उगाच नव्हते म्हणाले.) अर्थात, गाव हे एकक (युनिट) असतं, म्हणून ते ठळकपणे एकाच फ्रेममध्ये जाणवतं, एवढंच. निसर्गदत्त, रम्य-भव्यतेच्या पार्श्वभूमीवर नागराज गावाचं हे पाशवी रुप सावकाशपणे उलगडत शेवटी जो कडेलोट करतो, त्यानं अस्वस्थ होण्याऐवजी कोणाच्या जातीय अस्मिता कशा दुखावतात? (‘सैराट’ बघून त्या एका क्षणी तरी जात गळून पडावी!) गावातलं आयुष्य आनंदाचं आहे, असं त्यांना वाटणारच, जे या व्यवस्थेचे लाभार्थी आहेत. बाकी सा-या घटकांनीही, मग ते मुस्लिम असोत वा दलित, आणि अवघ्या महिला, आपापली स्पेस आखून घेत हे जगणे सुसह्य केलेले असते. या देशातल्या बायकांची किती घुसमट होते, हे पुरुषांना जाणवूही नये, अशा प्रकारे बायकांनी स्वतःला विरघळून टाकलेले असते. अशावेळी, एखादा ओरखडा उठतो, तेव्हा आतून तुम्ही काय आहात, हे समोर येते. ही हिंस्त्रता त्या मातीत आहेच. त्याचे पुरावे परशा-आर्चीच्या स्वप्ननगरीतही मिळत असतात. आपण मात्र तेव्हा ती ‘नॉर्मल’ मानून पुढे जातो. पण, त्याचा शेवट हाच असू शकतो. माझी एक देशमुख मैत्रीण म्हणाली, ते खरंय. “बाहेर सोडा, घरातील बायकांना माणूसपणाचे जगणे जे जगू देऊ शकत नाहीत, असे मराठे सावित्रीबाईंचा आणि जिजाऊंचा वारसा सांगतात, तेव्हा हसावे की रडावे, तेच समजत नाही.” हे सर्व मराठ्यांबद्दल खरे नाही. पण, मराठेपण मिरवणा-या मराठ्यांबद्दल खरे आहे. त्या न्यायाने जात मिरवणा-या कोणालाही ते लागू पडावे.

बहुसंख्य आहोत आणि बलशाली आहोत, या जोरावर आपण हवे ते करु शकतो, अशी धारणा असणा-या याच मराठा नेत्यांना आकस्मिकपणे आपण मागासलेले आहोत, असा साक्षात्कारही अधूनमधून होत असतो. हे मागासलेपण आहेच, पण ते या धारणांच्या संदर्भातले आहे. त्याचा विचार केल्याशिवाय मराठ्यांना पुढे जाता येणार नाही. 

‘सैराट’च्या निमित्ताने लहान मुलांवरील संस्कारांचा जो मुद्दा पुढे आला आहे, तो आत्यंतिक बाळबोध आहे. कॉलेजमधील मुला-मुलींची प्रेमकहाणी, यात कुठले संस्कार आडवे येतात, हे काही मला समजलेले नाही. सिनेमा संस्कार करणारच असेल, तर ‘सैराट’ मुला-मुलींना भव्य, उत्कट प्रेम करायला शिकवेल. जातीपातीच्या पल्याडचं प्रेम शिकवेल. मुलींना बुलेट, ट्रॅक्टर (आणि, पिस्तुलही!) चालवायला शिकवेल. मुलींना 'चीज' नव्हे, तर सशक्त माणूस करेल आणि मुलांना समंजस करेल. मुला-मुलींची चिंता तुम्ही करु नका. काय शिकायचं आणि काय नाही, ते त्यांना चांगलं समजतं. नागराजप्रमाणं हे माध्यम या पिढीलाच वश आहे.

(म्हणून तर, तुमच्यासारखे आई-बाप असूनही ही पिढी एवढी कर्तबगार निघालीय! संस्कारक्षम सौम्य विनोद हं!!!) 

मुद्दा आहे, तुमच्यावरील संस्कारांचा. पारंपरिक संस्कार पुसून, नव्या नितळ नजरेनं तुम्ही ‘सैराट’ बघणार की नाही? तुम्ही नाहीच बदललात, तर तुमच्याच घरातल्या परशा आणि आर्चीच्या रक्ताने हात माखतील तुमचे. प्रेमवीर नायक-नायिका हे फक्त उदाहरण. जात्यंध, धर्मांध मूलतत्त्ववाद अखेरीस सारंच संपवून टाकतो. मग, तुमचा रस्ता कोणता? प्रेमाचा की हिंसेचा? त्यावर तुमच्या पोरांचं आयुष्य अवलंबून आहे. बाकी कथित संस्कारांवर नाही.

हे असं आहे आणि तरीही मला वाटतं, हे बदलेल. म्हणून तर जब्याच्या एक पाऊल पुढं परशा गेला! या बदलानंच नव्या ‘आकाशा’ला जन्म दिलाय. आता आणखी पुढं जाता येणं शक्य आहे. पण, त्यासाठी थोडं बदलायला हवं. मुलांची चिंता करु नका. त्यांची दिशा तीच आहे. तुमचं काय?