Sunday, January 29, 2017

आवाजालाही व्यायाम हवा


आवाज हे वक्तृत्वाचे मुख्य अंग आहे. माणसाच्या नुसत्या बोलण्याच्या आवाजावरून त्याच्या अंतर्बाह्य़ संस्कृतीचा बोध होतो. वक्त्याच्या तोंडून नुसता पहिला स्वर निघताच तो विद्वान, व्यासंगी, निश्चयी, सत्यप्रेमी, कळकळीचा आहे की हळवा, कमजोर आहे याची श्रोत्यांना पारख करता येते. मनुष्याच्या अंत:करणातील गूढ विकाराचे आविष्करण त्याच्या स्वरांच्या रोखठोक अथवा कंपित लहरींवरून होत असल्यामुळे शीलाने तो कच्चा की पक्का, त्याच्या स्वभावातील बरे-वाईट गुणधर्म कोणते, त्याच्या भाषणात नि:स्पृहता आहे की दंभ आहे, तो ज्या विषयावर बोलणार आहे त्याबद्दल त्याचा आत्मविश्वास भरपूर आहे की कोता वगैरे अनेक गोष्टींचा साक्षात्कार श्रोत्यांना होतो.
भाषणाला काय किंवा व्याख्यान, प्रवचन, कीर्तनाला काय, निकोप आवाज हे मोठे आवश्यक भांडवल आहे. घोगरे, किरटे, चिरफाळलेले किंवा कोकीळकंठी बायकी आवाजाचे वक्ते पट्टीचे पंडित असले तरी श्रोत्यांवर त्यांना आपली छाप पाडता येत नाही. चारचौघांत बसून गप्पाष्टकी संभाषण करतानाही उत्तम, गहिरा, मोहक आवाजाचा चतुरस्र असामी बाकीच्या मंडळींवर तेव्हाच इतकी छाप पाडतो की थोडय़ाच वेळात तो एकटा वक्ता आणि बाकीचे सारे उत्सुक श्रोते असा बनाव बनतो.
आवाजालाही व्यायाम हवाच. व्यायामाने आणि नियमित आहार-विहाराने शरीरप्रकृती व काव्यशास्त्र विनोदप्रचुर ग्रंथांच्या व्यासंगाने मानसिक प्रकृती उत्तम राखण्याची आपण काळजी घेतो. शरीर नि मनाइतकाच आपला आवाजही निकोप आणि निरोगी राखण्याची जरुरी आहे हे फार थोडय़ांच्या लक्षात येते. सकाळ, संध्याकाळ दोन-दोन तास तंबोऱ्यावर सुरावटीची मेहनत (रियाज) करणाऱ्यांचा आवाज आणि आरोग्य उत्तम राहते.
उत्तम आकर्षक गायनासाठी सकस, निकोप आणि झारदार गळ्याची जेवढी आवश्यकता तेवढीच ती भाषिक वक्त्यांनाही असावी लागते. वक्त्यांच्या पांडित्यापेक्षाही त्याच्या भरघोस मोहक आवाजाच्या मोहिनीचाच श्रोत्यांवर परिणाम होत असतो. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर हे जसे उच्च श्रेणीचे गायनाचार्य होते तसे पट्टीचे वक्तेही होते. त्यांचे शास्त्रोक्त गायन ऐकताना श्रोते नादब्रह्माने जसे मंत्रमुग्ध होत तसेच त्यांचे व्याख्यान, प्रवचन चालले असतानाही श्रोते तल्लीनतेने माना डोलवीत असत. महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांनी शंभरी ओलांडली. पण त्यांच्या आवाजातील गोंडसपणा आणि गोडवा जणू काय अगदी बाल आवाजाचाच वाटत असे. कशाचा हा परिणाम? शारीरिक आणि मानसिक आरोग्याप्रमाणे या थोर पुरुषांनी आवाजाच्या आरोग्यालाही तितक्याच काळजीने जोपासले.
आवाज कमाविण्यासाठी वक्तृत्वाच्या हौशी व महत्त्वाकांक्षी उमेदवारांनी एखाद्या गवयाचे मार्गदर्शन पत्करल्यास फार चांगले. रोज तास-अर्धा तास तंबोऱ्यावर किंवा पेटीच्या स्वरावर खर्ज लावण्याच्या कसरतीने किरटा, घोगरा, कमताकद आवाज सुधारल्याची उदाहरणे आहेत.
आवाजाचा उपयोग करताना त्यावर कसल्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक दाब नसावा. तो अगदी मोकळा, दिलखुलास असावा. चोरटा नसावा. भाषणाची सुरुवात अगदी मंद, साहजिक आणि तोलदार आवाजात केली म्हणजे विचारशक्ती आपल्या ताब्यात राहते. उच्चार स्वच्छ, स्पष्ट आणि ठाशीव असले म्हणजे शब्दांचा नाद-निनाद श्रोत्यांच्या मनावर छान परिणाम घडवितो.
माईकवर मोठय़ा आवाजात बोलणे ही आवाजाची वारेमाप उधळपट्टीच आहे. ती टाळावी. श्रोता आणि वक्ता परस्पर सन्मुख असले पाहिजेत. भाषणात खरे महत्त्व भावनेला असून स्वरांच्या खोचा, वाक आणि आरोह-अवरोह निरनिराळ्या गोष्टीतील, विचारांतील किंवा तत्त्वातील भेद दर्शवितात.

‘स्व’त्व!

रवींद्रनाथांचे वडीलबंधू द्विजेंद्रनाथ हे उत्तम चित्रकारही होते. एकदा त्यांचा एक विद्यार्थी त्याने काढलेले चित्र घेऊन द्विजेंद्रनाथांना दाखवायला आला. वऱ्हांडय़ातच त्याची गाठ रवींद्रनाथांशी पडली. रवींद्रनाथांनी ते चित्र पाहिले आणि ते हरखून गेले. त्यातले आकार, त्यातली रंगसंगती, त्यातली त्रिमिती आणि मुख्य त्या चित्रातला चित्रकार म्हणून त्याचा विचार, सारे काही अद्भुत होते. रवींद्र त्या चित्राकडे पाहातच राहिले.
तेवढय़ात द्विजेंद्रनाथही तिथे आले. रवींद्रांनी ते चित्र दादांना दाखवले. तोंड भरून त्या चित्राचे कौतुक केले आणि आता दादांची प्रतिक्रिया काय म्हणून दादांच्या चेहऱ्याकडे पाहिले. दादांच्या चेहऱ्यावर आनंद अजिबात नव्हता, त्यांची भुवई चढली होती, ओठ आवळले गेले होते. मस्तकावरची शीर फुगली होती.. रवींद्रनाथांना कळेना.. दादांना या चित्राचा आनंद का होत नाहीये? ते एवढे संतापले का? आपल्या विद्यार्थ्यांने इतके चांगले काढलेले चित्र पाहून दादांना त्रास व्हावा? विद्यार्थ्यांचे यश गुरुला खुपावे? असा एक चुकार विचारही रवींद्रांच्या मनात येऊन गेला. तेवढय़ात दादांनी ते चित्र रवींद्रांच्या हातातून खेचून घेतले नि फाडून टाकले. रवींद्रनाथ थोडय़ा आश्चर्याने, रागाने हे सगळे पाहत होते. त्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या.. त्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा दादाने असा चुराडा करावा? रवींद्रांना सहन झाले नाही, ते म्हणाले, ‘‘दादा..’’ द्विजेंद्रनाथांनी संतापलेल्या डोळ्यांनीच त्यांना गप्प बसण्याची खूण केली आणि त्या चित्राचे तुकडे तुकडे करून त्या विद्यार्थ्यांच्या अंगावर भिरकावले. विद्यार्थी भरल्या डोळ्यांनी मान खाली घालून निघून गेला. दादा आत गेले आणि त्यांनी काढलेले चित्र घेऊन बाहेर आले.. अगदी तसेच.. जसे त्या विद्यार्थ्यांने काढले होते. त्यातले आकार, रंगसंगती, त्रिमिती आणि चित्रकार म्हणून त्यातला विचार.. सगळे अगदी तेच! रवींद्रनाथांच्या डोळ्यांतले दादांच्या वागण्याबद्दलचे आश्चर्य मावळले.. ‘गुरुला शिष्याचे यश बघवले नाही का?’.. या विचाराबद्दल रवींद्रांना अपराधी वाटू लागले.. शिष्याचे यश गुरुला खुपले नव्हते, तर त्याचे यश निर्विवाद असावे, स्वत:चे असावे म्हणून गुरुने धारण केलेले ते रौद्ररूप होते!
कलेतले यश हे अनुकरणाने टिकत नाही, तर कलावंताचा कलेतल्या ‘स्व’त्वानेच टिकते.
गुरुमुख से सीख पावूँ सूर ताल बंधी
वाहू को गाए बजाये नायकी कहलायी.
अशी पं. रातंजनकरबुवांची एक बंदिश आहे. जसेच्या तसे अनुकरण करणे ही नायकी.. पण या नायकीचे गायकीत रूपांतर व्हायला हवे असेल तर त्यात स्वत:चा विचार, स्वत:चा अनुभव हवाच.
उपजत अंग स्वभाव ले तान आलाप
किये राग सिंगार गायकी कहलायी
द्विजेंद्रनाथांनी काढलेले चित्र हे त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून, विचारांतून, परिपक्वतेतून आलेले. विद्यार्थ्यांकडे उत्तम चित्र काढण्याची क्षमता जरी अफाट असली तरी ते केवळ अनुकरण होते. अनुकरण हे साचल्या डबक्याप्रमाणे, तर अनुभव हा वाहत्या प्रवाहासारखा. अनुकरणाने कला साध्य होईल, पण सिद्ध होणार नाही. कला म्हणजे अवस्थांतर. शिकण्याच्या अवस्थेपासून स्वत:ला व्यक्त करण्याच्या अवस्थेपर्यंतचा प्रवास म्हणजे कला. मागे एकदा एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये १८ वर्षांचा मुलगा खूप सुंदर गायला. सगळ्या परीक्षकांनी तोंड भरून कौतुक केले. एक बुजुर्ग गायक त्या दिवशी अतिथी परीक्षक म्हणून आले होते. त्यांना जेव्हा त्यांची प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते म्हणाले, ‘‘अगदी मूळ गायकासारखे याने गायले. हे कॉपी-पेस्ट उत्तम होते.. पण माझी खरी प्रतिक्रिया मी अजून २० वर्षांनंतर देईन तेव्हा जर हा स्वत:चे काही गात असेल तर!’’ बुजुर्गाची ही प्रतिक्रिया सध्याच्या वा! वा!च्या जगात जरा बोचरीच होती; पण समजून घेतली तर डोळे उघडणारी होती..
‘स्वत:चे काही गात असेल तर’ यातला स्वत:चे हा शब्द फार महत्त्वाचा. आपला स्वत:चा विचार असायला हवा, भले तो छोटा असला तरी चालेल, फार व्यापक नसला तरी चालेल; पण तो आपला हवा. ज्ञानेश्वर माउलींनी गीतेचा भावार्थ सांगितला. म्हणजे विचार गीतेतले, पण ते अधिक उलगडून सांगितले; पण गीतेच्या विचारांची चौकट त्यांनी कायम पाळली. गीतेच्या शेवटी पसायदान लिहिताना मात्र त्यांनी स्वत:चा विचार मांडला, कारण पसायदान ही त्यांची स्वत:ची निर्मिती होती. इथे ते गीतेच्या विचारांच्या चौकटीत थांबले नाहीत, तर गीतेच्या विचारांच्या पुढे त्यांनी एक पाऊल टाकले. भगवंताने सांगितले, ‘परित्राणाय साधुनां विनाशायच दुष्कृताम्’ – ‘दुर्जनांच्या विनाशासाठी मी येईन’ ..पण माउली मात्र पसायदानात यापेक्षा उंच असा स्वत:चा विचार मांडतात. ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ ..खल असला तरी माणूस आहे. आत्ता वेगळ्या वाटेला गेलाय.. कदाचित परिस्थितीमुळे तसा झाला असेल; पण आतले स्वत्व चांगले असणार आहे. म्हणून खलांचा विनाश नको, तर खलांचे खलत्व दूर व्हावे, त्यांची वाकडी बुद्धी नाहीशी होवो, असे मागणे ते मागतात. ७०० श्लोकांचे ९००० ओव्यांत रूपांतर केल्यावर माउली स्वत:चा विचार शेवटी मांडतात, मांडू शकतात हे खरे ‘स्व’त्व!
अनेक शब्दांचे अर्थ हळूहळू घरंगळायला लागलेत. व्यवहारी, चतुर यांना सध्या धूर्तपणाची छटा आली आहे, तर उदासीन निराशेकडे झुकलाय तसेच ‘स्व’त्व म्हणजे अहंकार, दुरभिमान असा अर्थ वाटू लागलाय; पण ‘स्व’त्व म्हणजे अहंकार नाही, तर परिस्थिती, जडणघडण, अनुभव यातून घडलेले, वेगळेपण असणारे आपले व्यक्तित्व म्हणजे ‘स्व’त्व, आपल्या अस्तित्वाची जाणीव, स्वत:ला ओळखण्याची क्षमता. स्वत:ला ओळखता आले तर ‘स्व’त्व जपता येते. म्हणजे पुन्हा ‘कोऽहं’ हा सनातन प्रश्न आलाच. हा प्रश्न फक्त अध्यात्मात नाही तर कलेत आणि रोजच्या जगण्यातही पडतो.. किंबहुना पडायला हवा. अध्यात्मात कोऽहं आतल्या चैतन्याशी निगडित असतो, तर जगण्यात आणि कलेत तो स्वत:ला अधिक जाणून घेण्यासाठी असतो. म्हणजे आपल्या आवडीनिवडी, गुणदोष, क्षमता, विचार. कोऽहं चे उत्तर अध्यात्मात झटकन सोऽहं असे देता येते. (ते कळले किंवा कळले नाही तरी) पण जगण्यात आणि कलेत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कधी कधी याचे उत्तर देता येत नाही. अध्यात्मात, परमार्थात बरे असते. ‘स्व’चे समर्पणच करून टाकायचे असते.. ‘जो मेरा है वो तेरा है’ असे म्हणून मोकळे होता येते.. पण कलेत, जगण्यात असे मोकळे होता येत नाही. जे माझे आहे ते माझेच आहे.. भलेबुरे, चांगले-वाईट, लहानमोठे, यशापयशाचे धनी आपणच! यशाचे माप दुसऱ्याच्या पदरात टाकता तरी येते; पण अपयश मात्र आपलेच. कलेत किंवा जगण्यात ‘स्व’त्व विसर्जित करता येत नाही, तर ते सतत जागे ठेवावे लागते..
‘स्व’त्व जागे कसे असते यासाठी सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक मिश्चेरचे वाक्य सांगता येईल. मिश्चेर म्हणतात, ‘‘जर मी ३ दिवस सलग रियाज केला नाही तर माझ्या श्रोत्यांना ते माझ्या वादनातून कळते, मी सलग २ दिवस रियाज केला नाही तर ते माझ्या समीक्षकांना कळते आणि मी १ दिवस जरी रियाज केला नाही तर कार्यक्रमात ते मला कळते..’’ ‘स्व’त्व जागे असलेली व्यक्तीच स्वत:शी अशी प्रामाणिक राहू शकते. आपले गाणे आपण म्हटले पाहिजे; पण ते आधी आपल्याला पटले पाहिजे. मग आपले ‘स्व’त्व त्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. कुसुमाग्रज म्हणाले होते, ‘‘तुम्ही माझ्या कवितेशी बोलत असाल तर माझ्याशी बोलूच नका, कारण माझ्या कवितेतच मी सापडेन तुम्हाला पुष्कळसा..’’ ‘स्व’त्व जागे असेल तर कला आणि जगणे असे एकरूप होऊन जाते. प्रत्येकाच्या अंतरंगातले चैतन्य जरी एकच असले (ममैवांशो जीवलोक:) तरी प्रत्येकाचा ‘स्व’ मात्र वेगळा असतो.
‘असो पाखरू मासोळी जीव जीवार मुंगळी
प्रत्येकाची ठेव ठेव काही आगळी वेगळी..’
हे आगळेवेगळे ‘स्व’त्व आपल्या ठायी आहे याची जाणीव ज्या क्षणी होते तेव्हाच आतली कला, आपण, आपले विचार बहरायला लागतात. हा कलेचा बहर आपल्या विद्यार्थ्यांच्याही आयुष्यात यावा, हीच द्विजेंद्रनाथांची इच्छा होती. चित्र फाडून टाकण्याच्या एका क्षणाच्या कृतीत ‘स्व’त्वाचे सारे विचारसंचित सामावले होते! या कथेत द्विजेन्द्रनाथांच्या विद्यार्थ्यांने पुढे काय केले हे माहीत नाही; पण नक्कीच त्या चित्रात न उमटलेले ‘स्व’त्व त्याला गवसले असेल. ते चित्र आता त्याच्या दृष्टीतून, विचारातून जन्माला आले असेल.