Saturday, May 17, 2014

वृंदावन…



कधिचं बंद पडलेलं कारंजं होतं तिच्या दारापुढे, तसं दारही सतत बंद असायचं

खिडकिचंएक दार उघडं तर एक बंद असायचं जाळी जरा फाटलेली म्हणून घरातलं थोडं दिसायचं ,

दिसण्यासाठी घरात होतं काय म्हणा.. ती बसायची ती मोडकी खुर्ची आणि कलंडत्या टेबलावर कधीचा राहून गेलेला पेला त्यातलं पाणी सुद्धा आता वाळून गेलं ती गेली तेंव्हा तिचा घसाही कोरडा होता.. पाणी समोर होतं पण म्हणे प्यायचं तिच्या लक्षातच आलं नाही.. दिवसभर तसा अंधारच असतो घरात.. रात्री जास्त गडद होतो इतकच.. कसली चाहूल नाही हालचाल नाही, आधी ती होती तेंव्हा किंवा ती असे पर्यंत एक मांजर तिच्या पाशी अंगाचं मुटकुळं करून बसायची पण ती ही स्तब्ध शांत.... ती तग धरू शकली नाही तर तो मुका जीव कुठला तग धरायला...आता माजलेल्या पाली सर्र्कन सरकतात मनत चर्र होतं,पण पालींचं सरपटणं ते कसलं? कीडा मुंगी बघून सरपटणार त्या... त्याने कधी हालचाल होते का?.....कुबट वास भरून राहिलाय त्या वास्तूत.. दाराशी गेलं की जाणवतो .म्हणे तिच्या राहून गेलेल्या समानाचा असेल.. तिच्या गावाला गेलो की मी डोकावतो कधी कधी तिच्या घरात,.. आणि तिच्या गावाला काय ,तिच्या घरात डोकावण्यासाठीच मी जातो.... आता कसली ओढ आहे कोणजाणे... तेंव्हा जमलं नाही... आणि आता..
तसे इथले गावकरी सांगतात वेळी अवेळी येऊ नका ती अजूनही कोणाकोणाला दिसते अंगावर चवताळून येते... जिवंतपणी जे जमलं नाही ते तिला गेल्यावर कसं जमेल?
पण मी कोणाशी फार बोलत नाही, नाहीतर माझ्याच तोंडून निघायचं तिने ही वास्तू माझ्याच नावावर केल्याचं.. नसते प्रष्न उभे राहयचे ते विचारायला आणखी चारजण यायचे
चारजणाना कळलं तरी हरकत नाही..
पण माझ्या मुलाना कळायला नको... हयातभर तिच्या वरून मला टोमणॆ मारले, मला भेटू दिलं नाही. पण वास्तूवर मालकी हक्क दाखवायला ते माझ्यावरही हक्क दाखवतील. वारशाहक्काने मालमत्ता मिळवायला ते माझाही विचार करू शकतील तसा मरणाला मी भीत नाही... ओसाड काय फक्त वास्तूच होत नाही..
भयाण काय फक्त घरच होत नाहीत विराण काय फक्त घरासमोरच्या हौसेनं लावलेल्या बागाच होत नाहीत...
वास्तू असो की व्यक्ती ती आप आपलं प्राक्तन घेऊन येते
ती तिचं प्राक्तन भोगून गेली , मी माझं भोगतोय..
पण तरी मुलांच्या हातून मरण यावं असं मला वाटतं नाही... त्यापेक्षा खरच तिनेच यावं आणि तिच्या बरोबर जाण्याचा मार्ग दाखवावा....
तिचं भूत बीत होणं शक्यच नाही... ज्यांच्या इछ्चा अपूर्ण राहतात त्यांची भूतं होतात.. तिने एकच ईछ्चा धरली होती आणि नंतर डोळे कोरडे ठेऊन त्यावरही पाणी सोडलं होतं... वाचून संपलेलं पुस्तक छातीशी धरून बसावं तशी ती जगून झालेलं आयुष्य कवटाळून बसली होती...तीचा शेवट झाला, ती सूटली आणि मी त्या बंद दारापाशी अडकलो.. नक्की कुठल्या मार्गानं ती सटकली...?
जरा हालचाल झाली जरासा आवाज झाला वास्तू जरा बावचळली मला क्षणभर वाटलं तीच आली.. म्हणाली ये मी कुठून सटकले ती फट तुला दाखवते... खरं सांगतो अजिबात घाबरलो नाही उलट उत्सुकतेने सावरलो.. आली आहेस तर दिसत का नाहीस असं व्याकूळतेने म्हणालो....
आणि तिन्हिसांजेच्या त्या धुळकट अंधारात दिसली ती मनी... तिची लाडकी मनीमाऊ.. ही इतकी वर्ष कशी जगली? हिने मला कसं ऒळखलंन?
पण खरच ती मला घाबरली नाही मी ही घाबरलो नाही जणू तिने मला खूण केली आणि मी तिच्या मागे मागे वास्तूच्या परसदारी गेलो... वड पिंपळ तसेच होते विहिर जाळी टाकून बंद केली होती विहिरी जवळची केळ कधीच सूकून जळायला आतूर झाल्यासारखी जख्ख वाळली होती.. लाजाळूचं रान पसरलं होतं..
जास्त निरखायला वेळ नव्हता कारण माऊला वेळ नव्हता तिची घाई ओळखून मी माऊच्या मागे गेलो मागच्या जिन्याखाली एक अडगळीची खोली होती त्याचं दार धक्का देऊन उघडता येत होतं माऊ आत गेली तशी भारावल्या सारखा मी सुद्धा तिच्या मागनं आत गेलो...तिच्या इतकं सहज आत जाणं मला जमलं नाही...पण गेलो आणि बघतो तर काय या माऊने चार पिल्लाना जन्म दिला होता... ती माऊ तिची नव्हती पण तिच्या माऊच्या वंशातली होती... कारण दहा पंधरा मांजरं आपाअपली जागा घेऊन निवांत बसली होती... जणू मी तिथे येतो मी येणार हे त्याना माहीतच होतं.. जशी तिची मनी मी गेलो की माझ्या मांडीवर येऊन बसायची तशीच ती मांजरं माझ्या भोवती जमा झाली..त्यांच्या नजरा माझ्याशी संवाद साधायला तत्पर होत्या...लयबद्ध शेपटी हालवत होत्या पण त्यामुळे तिथली शांतता भंग पावत नव्हती...
क्षणात मला त्या वास्तूत चैतन्य जाणवलं...घडामोड हा सृष्टीचा नियम आहे ती या ना त्या रूपात सूरूच असते कधी तिचा प्रवाहं खळखळता असतो.. कधी लूप्त....तिथे
भयाण आधी कधी वाटलच नाही पण आता साचून राहिलेलं मौनही पसार झालं
मी घरभर फिरलो मागच्या खोलीत, रावजींच्या म्हणजे तिच्या वडिलांच्या खोलीत... खरमरीत नकार ऐकायला एकदा त्या खोलीत डोकावलो होतो....ती जिन्याशी नजर जमिनीला खिळवून उभी होती, बाहेर पडताना तिरमिरीत मी तिच्याकडे बघितलही नव्हतं... तो जिना आज मी चढून वर गेलो मागल्या गच्चीचं दार सताड उघडलं....अधाशा सारखा घर भर फिरलो आणि तिला म्हणालो भयाण तर माझं घर आहे जिथे मी राहतोय..तिथे माणसांचा वावर आहे पण सहवास नाही....
तुझा सहवास मिळणार असेल तर मी...मी इथे राहयला तयार आहे... तेंव्हाच दूर देवळात आरतीची घंटा वाजली त्या निरव शांततेत ती ताल धरून घुमली... आणि मी तोच कौल समजलो...

No comments:

Post a Comment